
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपण्याच्या काही तास आधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोठा धमाका केला. ‘बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता आल्यास महिलांच्या खात्यात मकर संक्रांतीच्या दिवशी 30 हजार रुपये टाकले जातील, अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली.
पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा समारोप करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात आमचे सरकार येताच आई-बहीण सन्मान योजना लागू करण्यात येईल. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात 2500 रुपये टाकले जाणार आहेत. आमचे सरकार येताच 14 जानेवारीला पूर्ण वर्षाचे 30 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील, असे तेजस्वी यांनी सांगितले. बिहारची जनता यावेळी बदलाच्या मूडमध्ये आहे. यावेळचे मत हे परिवर्तनाचे मत असेल. हे मत एनडीए सरकारला उखडून फेकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्या मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिह्यांतील 121 मतदारसंघांचा समावेश आहे. पाटणा, भोजपूर, बक्सर, गोपालगंज, सिवान, सारण, मुझ्झफरपूर, वैशाली, दरभंगा, समस्तीपूर, मधेपूर, सहरसा, खडगीया, बेगुसराय, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा या 18 जिह्यांत मतदान होणार आहे.




























































