आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास पगाराला कात्री, तेलंगणा विधानसभेत विधेयक सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱया मुलांना वठणीवर आणण्यासाठी तेलंगणा राज्याने कठोर पाऊल उचलले आहे. पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या पगारात 15 टक्के किंवा 10 हजारांपर्यंत कपात केली जाणार आहे. तेलंगणा सरकारने शनिवारी यासंदर्भातील विधेयक विधानसभेत सादर केले. त्याला येत्या काही दिवसांतच मंजुरी मिळणार आहे. खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱया सर्वच कर्मचाऱयांना पगारकपातीचा निर्णय लागू होणार आहे.

तेलंगणा सरकारचा प्रस्तावित कायदा सामान्य नागरिकांसह आमदार-खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही लागू असेल. या विधेयकानुसार, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांची मुले दुर्लक्ष करत आहेत, त्यांचा योग्यरीत्या सांभाळ केला जात नाही ते पालक थेट जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज दाखल करू शकतील.

पालक आणि मुलांचे म्हणणे ऐकून घेणार 

जिल्हाधिकारी तक्रारीवर निर्णय देण्यापूर्वी वृद्ध पालक आणि कर्मचारी असलेल्या मुलाचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्या सुनावणीनंतर पगारातून किती रक्कम कपात करायची हे स्पष्ट करणारा आदेश जारी केला जाणार आहे. कपात केलेली रक्कम थेट संबंधित पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विधेयकात जन्मदात्या पालकांबरोबरच सावत्र पालकांसाठीही तरतूद आहे.