मोबाईल रिचार्ज महागणार?

टेलिकॉम कंपन्या 17 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत, 5जीसाठीही मोजावे लागणार जास्तीचे पैसे

महागाईने होरपळणाऱया सर्वसामान्य लोकांना लवकरच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्ज महाग करणार आहे. कंपन्यांची ही दरवाढ 17 टक्क्यांपर्यंत असू शकते. तसेच 5जीसाठीही ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. यासंबंधी अधिकृत माहिती कंपन्यांनी अद्याप दिली नाही. परंतु आगामी दोन ते तीन महिन्यांत कंपन्या महागाईचा झटका देण्याच्या तयारीत आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार, या वर्षी मोबाईल सेवा शुल्कात 15 ते 17 टक्क्यांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जिओ आणि एअरटेल कंपन्या प्रीमियम वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा देणेसुद्धा थांबवू शकतात. जून-जुलैपर्यंत दर वाढवण्याचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात. मोबाईल फोन सेवा 20 टक्के महाग होतील. त्याच वेळी 4जीच्या तुलनेत 5जी सेवेसाठी पाच ते दहा टक्के अधिक शुल्क आकारले जाऊ शकते.

5जी स्पेक्ट्रमवर करोडो खर्च

जिओ या वर्षी सरासरी 15 टक्क्यांनी दर वाढवण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी स्पेक्ट्रमवर मोठी रक्कम खर्च केली आहे. त्यातुलनेत रिटर्न ऑफ पॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच खर्चाच्या प्रमाणात कमाई खूपच कमी आहे. अनलिमिटेड योजनांमुळे कंपन्यांचे उत्पन्न आतापर्यंत कमी राहिले आहे.