
एका टीव्ही अभिनेत्यावर त्याच्याच सावत्र आईने बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्कार करून त्याने आपल्या कपाटातील मौल्यवान ऐवज चोरल्याचीही तक्रार पीडितेने केली आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला (58) ही लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे राहते. ती या 40 वर्षीय अभिनेत्याची सावत्र आई असून हा तिचा तिसरा विवाह आहे. अभिनेत्याचे पिता हे देखील दिग्दर्शक म्हणून काम करतात. त्यांनी अनेक मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, हा अभिनेता तिच्या घरी आला होता. ती घरात एकटी आहे असं पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिच्या कपाटातून दागिनेही चोरले आणि पळवले असा आरोप तिने केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. सध्या या महिलेच्या तक्रारीची तपासणी करण्यात येत आहे. कारण, महिलेचे अभिनेत्याशी मालमत्तेवरूनही वाद आहेत. ही तक्रार मालमत्तेच्या वादातून करण्यात आलेली आहे किंवा खरी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.































































