दोन महिने तापाचे… कोरोनासोबत तापमानही वाढणार, तोंडाला मास्क आणि डोक्यावर छत्री हवीच!

कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण एप्रिलसह मेअखेरपर्यंत वाढणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांकडून दिला गेला असतानाच भारतीय हवामान विभागानेही पुढील दोन्ही महिने सूर्य आग ओकणार असल्याचा अलर्ट जाहीर केल्याने टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पुढील दोन महिने ‘तापा’चे राहणार असून कोरोनापासून वाचण्यासाठी ‘तोंडाला मास्क’ आणि उन्हापासून वाचण्यासाठी ‘डोक्यावर छत्री’ अशीच स्थिती राहणार आहे.

पारा चाळिशी पार करणार

हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार पुढील दोन महिन्यात अनेक वेळा तापमान 40 अंश सेल्सिअसचा आकडा पार करणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंजाब आणि हरयाणा अशा विविध नऊ राज्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे.

सलग तिसऱया दिवशी तीन हजारांच्या घरात

सलग तिसऱया दिवशी देशात तीन हजारांच्या घरात कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली. देशात गेल्या 24 तासांत 2994 रुग्ण नोंदवले गेले. तर महाराष्ट्रात 669 तर मुंबईत 189 रुग्णांची नोंद झाली.

नौदलप्रमुखांना कोरोना

देशाचे नौदलप्रमुख ऍडमिरल हरी कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील कॉन्फरन्सआधी त्यांच्या सुरक्षेसंबंधित कर्तव्यावर असणाऱया 1300 कर्मचारी-अधिकाऱयांची कोरोना चाचणी केली असता 22 जणांना लागण झाल्याचे समोर आले.

अशी घ्या काळजी

प्रखर उन्हात घराबाहेर पडू नका
सुती कपडे, टोपी,
छत्रीचा कापर करा
पचण्यास जड पदार्थ खाणे टाळा
पुरेसे पाणी, सरबत, नारळपाणी प्या

काही राज्यांत पाऊस

हवामान खात्याच्या इशाऱयानुसार काही राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री घेऊन फिरताना याच छत्रीचा वापर पावसापासून वाचण्यासाठी करावा लागण्याची शक्यता आहे.