
मुंबई शहर व उपनगरात बुधवारी हवेतील आर्द्रता अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढली. त्यामुळे मुंबईकर संपूर्ण दिवसभर घामाच्या धारांमध्ये अक्षरशः चिंब झाले.
मुंबईत मागील काही दिवस ढगाळ वातावरण होते. याचदरम्यान शहराच्या दिशेने वाहणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांची दिशा बदलली आहे. त्याऐवजी पूर्वेकडील वारे मुंबईच्या दिशेने वाहू लागले आहेत. परिणामी, शहरात एकाएकी हवेतील आर्द्रता वाढली आहे. बुधवारी कुलाब्यात 79 टक्के, तर सांताक्रुझमध्ये 67 टक्के आर्द्रता नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास होते. मात्र आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे दिवसभर मुंबईकरांची प्रचंड लाहीलाही झाली. घराबाहेर पडलेले मुंबईकर घामाच्या धारांमध्ये चिंब होऊन घरी परतले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत मुंबईत उष्णतेची लाट धडकणार आहे. या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात 7 अंशांची मोठी वाढ होईल आणि पारा 40 अंशांची पातळी ओलांडेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील तापमान 45 अंशांच्या पातळीवर उसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी राज्यभरातील 10 हवामान केंद्रांवर 40 अंशांच्या पुढे कमाल तापमान नोंद झाले, अशी माहिती कुलाबा वेधशाळेतील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली.
अकोल्यात पारा 43.5 अंशांवर
महाराष्ट्रात अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.5 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत ग्रामीण भागातील ही होरपळ आणखी वाढणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे भाकीत आहे.
देशातील 17 राज्ये उष्णतेने होरपळणार
देशातील बहुतांश भागात कडक उन्हाच्या झळा बसत असून तापमानात सुमारे 9 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. ओडिशासह 10 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर 17 राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, ‘मोचा’ या चक्रीवादळामुळे बंगालमध्ये पारा आणखी वाढला आहे. 11 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोलकात्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज, उद्या उष्णतेची लाट
गुरुवारी आणि शुक्रवारी तर मुंबईत उष्णतेची लाट धडकणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. शहराचा पारा 6 ते 7 अंशांची उसळी घेऊन चाळिशीची पातळी ओलांडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.


































































