
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातील काही भागात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने तापमानाचा पारा घसरला होता. मात्र, तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ होत आहे. येत्या दोन दिवसात तापमानाचा पारा वाढून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 39 अंशापर्यंत पोहचला होता. मात्र, राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली होती. मात्र, तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. राज्यात सरासरी तापमान 38 अंशावर पोहचले होते. त्यामुळे शहरात उकाडा वाढला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील तापमानात घट झाली होती. मात्र, येत्या दोन दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेच्या झळा बसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. समुद्रावरून आणि उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात विदर्भासह काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


























































