मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट; मुंबईच्या उपनगरांतील पारा 40 अंशांवर जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळी सणाची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेने कहर करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट धडकली असून मुंबईच्या उपनगरांतील पारा थेट 40 अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानामध्ये पाच अंशांची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक होत असलेल्या या तापमानवाढीने मुंबईकर बेजार झाले आहेत.

हवामान विभागाने 4 ते 6 मार्च दरम्यान ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचे संकेत दिले आहेत. मार्च 2026 ते मे 2026 या कालावधीत देशातील बहुतांश भागात तापमान कमाल आणि किमान तापमानापेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः देशाच्या पूर्व आणि पूर्व-मध्य भारत, आग्नेय द्वीपकल्पातील काही भाग आणि वायव्य आणि पश्चिम-मध्य भागात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि उत्तर तामिळनाडूच्या काही भागात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.