सावधान…तापमानवाढीचे वर्ष येत आहे; ‘नासा’ने दिला गंभीर इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडून सुद्धा वातावरणामध्ये उष्णता जाणवत होती. धो-धो पाऊस कोसळल्यानंतरही घामाच्या धारा लागत होत्या. या वर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण महिना असल्याचे अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने अधिकृतपणे जाहिर केले आहे. त्यासोबतच 2024 मध्ये उष्णता वाढणार असल्याचा इशाराही दिला आहे. या उष्म्यापासून वाचण्याची तयारी आत्तापासूनच करावी लागणार असल्याचे नासाने म्हटले आहे. तसे न केल्यास भयंकर परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वातावरणातील बदलांमुळे जगातील अनेक भागांमध्ये विविध प्रकारची संकटे ओढावली आहेत. अद्याप अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे, आणि हा उच्चांक वाढतच चालला आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांच्यामते नासाने केलेल्या संशोधनानुसार या वर्षी कोट्यावधी लोकांना भयंकर उष्मा सहन करावा लागला आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त उष्णता नोंदविण्यात आली आहे.

बिल नेल्सन यांच्यामते, जगातील प्रत्येक देशाला हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येकाने यामागचे कारण समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा पृथ्वी राहण्यास योग्य राहणार नाही. यासाठी आपण स्वत:पासून पृथ्वी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

यंदा 3 जुलै ते 7 ऑगस्ट असे सलग 36 दिवस भयंकर उष्मा होता. वातावरणात होणारे कार्बन उत्सर्जन आणि त्यासोबतच अल-निनोचा प्रभाव या दोन घटकांमुळे संपूर्ण पृथ्वीवर उष्णता वाढली आहे. अगदी अमेरिकेपासून ते चीन पर्यंत कोणत्याच प्रदेशात थंडी जाणवली नाही. तापमान सामान्यापेक्षा जास्त आहे. चीनमध्ये उष्णतेमुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उष्णतेमुळे कॅनडा, रशिया, युरोप, आफ्रिका आणि हवाई बेटांमध्ये वणवा पेटून, प्रचंड प्रमाणात जीवितहाणीला सामोरे जावे लागले आहे. तर अमेरिका, मध्य-पूर्व, आशिया आणि युरोप सारख्या देशांना मान्सून वादळे व ढगफूटीला सामोरे जावे लागले आहे.

दुसरीकडे, NOAA चे प्रमुख साराह कॅपनिक यांच्यामते, मानव जेव्हापासून उष्णतेच्या नोंदी ठेवत आहे, तेव्हापासून 2023 हे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. अल-निनोचा प्रभाव पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्येही दिसणार आहे. सध्या तापमानात 0.4 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे.