गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लष्करी अधिकाऱ्यांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

167

सामना प्रतिनिधी । नाशिक

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास 50 टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवीत दोन भामट्यांनी दहा लष्करी अधिकाऱ्यांची 78 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंदरसिंग करनसिंग हे सध्या कश्मीर येथे लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. सन 2016 मध्ये ते देवळाली कॅम्प येथे सेवेत असताना त्यांची ओळख सैफ कलीम शेख व सुरेश करवत्ता या दोघांशी झाली. त्यांनी देवेंदरसिंग यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास 50 टक्क्याहून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. देवेंदरसिंग यांनी 1 जून 2019 पर्यंत एकूण 28 लाख, त्यानंतर 13 जून 2019 पर्यंत 40 लाख रुपये गुंतविले. देवेंदरसिंग यांनी याबाबत आपल्या लष्करातील अन्य अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. नऊजणांनी देवेंदरसिंग यांच्यामार्फत वरील दोघांकडे 10 लाखांची गुंतवणूक केली. मात्र, आजपावेतो पैशांचा परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमवारी देवेंदरसिंग यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदविली, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. आर. जाधव यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या