
जुहू येथील समुद्रात बुडून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोह्हमद उमेर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
मोह्हमद हा डी. एन. नगर परिसरात आई वडील आणि तीन भावंडांसोबत राहत होता. तो नेहमी खेळण्यासाठी सायकलने जुहू चौपाटी येथे जात असायचा. शनिवारी दुपारी मोह्हमद हा क्लासवरून घरी आला. त्यानंतर तो खेळण्यासाठी सायकलने जुहू चौपाटी येथे गेला. दुपारी समुद्राला भरती असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडाला. मोह्हमदचा मृतदेह रेतीत आढळून आल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काहीच वेळात जुहू पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी मोह्हमदचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. रात्री मोह्हमद घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचे कुटुंबीय डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गेले असता त्याना मोह्हमदचा फोटो दाखवला. त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. त्यानंतर मोह्हमदचे नातेवाईक हे जुहू पोलीस ठाण्यात आले. जुहू पोलिसांनी मोह्हमदच्या वडिलाचा जबाब नोंदवून घेतला आहे.


























































