
हमास विरुद्ध तुंबळ युद्ध सुरू असतानाच इस्रायलमध्ये सरकार आणि लष्करामध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा याएर नेतन्याहूने केलेल्या ट्वीटमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. इस्रायलचे लष्करप्रमुख एयाल जामिर देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा प्लान आखत आहेत, असा आरोप याएर नेतन्याहू याने केला आहे.
गाझापट्टी 100 टक्के ताब्यात घ्या असे आदेश बेंजामिन नेतन्याहू यांनी सैन्याला नुकतेच दिले. गाझा ताब्यात घेणे जमत नसेल तर राजीनामा द्या, असेही त्यांनी लष्करप्रमुखांना सुनावले होते. लष्करप्रमुख जामिर यांचा नेतन्याहू यांच्या योजनेस विरोध आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या 25 टक्के प्रदेशात इस्रायली कैदी आहेत. त्यामुळे या प्रदेशात हल्ले करणे कठीण आहे. इस्रायली सैन्यासाठी देखील ते धोक्याचे ठरू शकते, असे जामिर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पंतप्रधान व लष्करप्रमुखांमधील मतभेद चव्हाटयावर आले आहेत. त्यातच पंतप्रधानांच्या मुलाने थेट लष्करप्रमुखांवर कटाचा आरोप केल्याने वातावरण पेटले आहे.