बिल्डिंग मोडकळीस आल्याने लग्ने जुळेनात, काळाचौकीच्या शिवराम चाळीतील संसारांना वाळवी!

41
shivram-chawl-kalachawki

सामना प्रतिनिधी । मुंबई

काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावरील 125 वर्षे जुनी डॉ. शिवराम चाळ अखेरची घटका मोजतेय. जागामालकाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आम्ही जगायचे म्हणून जगतोय, उद्याचा भरवसा नाही. बिल्डिंग कधीही डोक्यात कोसळेल, सगळे देवावर सोडलेय, अशी कैफियत चाळीतील भाडेकरू मांडताहेत. चाळीला पूर्णपणे वाळवी लागल्याने अनेक मुलांची लग्न होत नसल्याची उदाहरणे आहेत.

दक्षिण मुंबईतील शेकडो जुन्या सेस इमारतींपैकीच ही दोन माळय़ाची चाळ. यात 76 भाडेकरू आणि 24 दुकाने आहेत. म्हाडाने पाच महिन्यांपूर्वीच चाळीची दुरुस्ती केली. मात्र काही दिवसांतच कोसळलेल्या प्लास्टरने त्या दुरुस्तीचे पोकळ वासे उजेडात आले. त्यानंतर रहिवाशांनी वर्गणी काढून बिल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्या अहवालात बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी आणखी 47 लाखांचा खर्च गरजेचे असल्याचे म्हटले आहे. चाळीचा पाया उंदीर-घुशींनी भुसभुशीत केला आहे. प्रत्येक घराच्या छप्पराला, दारे-खिडक्यांना वाळवी लागली आहे. खिडक्या चाळीखाली उभ्या असलेल्या रहिवाशांच्या कधीही डोक्यात कोसळतील. भिंतींना जागोजागी तडे गेलेत. पावसात घरात पाणी गळते. ड्रेनेज लाइन नेहमीच तुंबलेली. अशा धोकादायक स्थितीत आम्ही सुखाने कसे काय झोपू, असा हतबल सवाल किरण घोगरे आणि अन्य रहिवाशांनी केला.

दुर्घटनेच्या भीतीने घरे, दुकाने सोडली

बिल्डिंग कधीही कोसळेल, डोक्यावर वाळू-दगड पडताहेत, पावसाचे पाणी गळतेय, शेजारून बस गेली तरी फ्लोअरिंग हादरतेय. अशा स्थितीत दुर्घटनेची भीती सतावू लागल्यामुळे आठ ते दहा कुटुंबे आणि दुकानदारांनी दुसरीकडे स्थलांतर केले आहे. रूम नंबर 21 मधील रहिवासी लता शिरवाडकर यांनी लहान मुलांच्या सुरक्षेसाठी संसार दुसरीकडे हलवला.

आमच्या चाळीला टेकू लागले होते. म्हाडाने पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती करून ते हटवले, पण धोका काही कमी झालेला नाही. दुसरीकडे राहणे परवडत नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून राहतोय. बिल्डिंगला वाळवी लागलीय; पण म्हाडा आम्ही त्यावर काही करू शकत नाही असे सांगतेय. चाळमालक तर आमची फसवणूकच करतोय.
– विभावरी सावंत, रहिवासी

चाळमालक आमचा छळ करतोय. अडीच वर्षांचे भाडे, तेही 30 ते 40 टक्क्यांनी वाढवून मागतोय. आधी भाडे द्या, नंतर पुनर्विकासाचे बघू, अशी अट घालून आमच्या जिवाशी खेळ चालवलाय. आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय याची चाळमालकाला काहीच तमा नाही. आता म्हाडानेच चाळीचा पुनर्विकास करून आमचे जीव वाचवावेत.
– अमरदीप गोसावी, रहिवासी

आपली प्रतिक्रिया द्या