
पाहताक्षणीच अंगाकर काटा यावा, काळीज सुन्न व्हावे, डोळ्यांमध्ये अश्रू दाटावेत असे कश्मीरातील एक छायाचित्र आज व्हायरल झाले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीदरम्यान चुकून गोळी लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या त्या व्यक्तीच्या अंगावर बसून त्याचा तीन वर्षांचा नातू त्याला उठवत होता. त्यांना हलवत होता, मारत होता पण आजोबा काही उठलेच नाहीत. नातवाच्या आर्त किंकाळ्यांनी सुरक्षा दलाचे जवानच काय, अवघे कश्मीर हेलावून गेले असेल असे हे दृश्य होते.
कश्मीर खोऱयातील दहशतवादाचा भयंकर चेहराच या छायाचित्राने पुन्हा एकदा जगासमोर आणला. सोपोर येथील आज पहाटेची ही घटना आहे. तेथील एका मशिदीमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांबरोबर सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली. दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत होते. त्यात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. इतर तिघे जखमी झाले.
त्याच दरम्यान आपल्या नातवाला घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला गोळी लागली. तो कोसळून खाली पडला. ते पाहून नातूही घाबरला. आजोबा खाली पडले होते. त्यांचे कपडे रक्ताळले होते. त्यांना उठवण्याचा प्रयत्न तो करत होता. गोळ्यांच्या आवाजातच त्याच्या रडण्याचा आवाजही घुमत होता. ते दृष्य पाहताच सुरक्षा दलाचे जवान त्या चिमुरडय़ाला वाचवण्यासाठी धावले. एकप्रकारे ते सुरक्षा दलासमोर आव्हानच होते. गोळीबाराच्या दिशेला त्यांनी वेगाने आपली वाहने वळवली.
– मशिदीच्या वरच्या मजल्यावरून दहशतवादी गोळीबार करत होते. दुसरीकडे ‘मुझे माँ के पास जाना है’ असे म्हणत तो मुलगा रडत होता. सुरक्षा जवानाने त्याला तिथून दूर हटण्यास सांगितले. मात्र तो आजोबांच्या अंगावरून उठण्यास तयारच नव्हता. एक जवान अंदाधुंद गोळीबारातही मार्ग काढून त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याला उचलून घेतले आणि सुरक्षित जागी आणले. काही वेळापूर्की बंदुकीच्या ट्रिगरवर असलेले हात त्या मुलाला गप्प करण्यासाठी त्याच्या डोक्यावरून फिरत होते. त्या जवानाने त्याला चॉकलेट, बिस्किटे दिली. काही बिस्किटे आधीच त्या मुलाच्या हातात होती. आजोबांच्या रक्ताने ती भिजली होती. काही वेळानंतर सुरक्षा जवानांनी त्या मुलाला आपल्या गाडीमध्ये बसवून सुरक्षित स्थळी नेले.


























































