
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळाय़पूर्वी राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदकडून रचला जात आहे. देशातील प्रमुख नेते व संस्था दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. याबाबत गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिल्ली पोलिसांना दहा पानी अलर्ट जारी केला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जैश, लश्कर-ए-तोयबा यांसारख्या अनेक दहशतवादी संघटना राजधानी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करा, स्वातंत्र्य दिन सोहळय़ाच्या ठिकाणी प्रवेशाचे कडक नियम लागू करा, प्रमुख नेते आणि संस्थांची सुरक्षा वाढवा, वर्दळीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवा, अशा विविध सूचना गुप्तचर यंत्रणेने दिल्या आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची सार्वजनिक कार्यक्रमात गोळय़ा झाडून झालेली हत्या तसेच उदयपूर व अमरावती येथील घटनांचा उल्लेख अलर्टमध्ये केला आहे.
लाल किल्ला परिसरात एक हजार सीसीटीव्ही
गुप्तचर यंत्रणेने दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. स्वातंत्र्य दिन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या परिसरात उच्च क्षमतेचे एक हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नवी दिल्ली जिल्हा, उत्तर जिल्हा, दक्षिण-पूर्व, मध्य जिल्हा, सिक्युरिटी युनिट, उत्तर पश्चिम जिल्हा या भागांत हे कॅमेरे लावले जाणार आहेत.

























































