
सामना ऑनलाईन। टेक्सास
प्रेमाची झिंग ही काही औरच असते. त्यातही आपलं समोरच्या व्यक्तीवर किती अफाट प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी हे प्रेमवेडे काय करतील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार दक्षिण अमेरिकेतील टेक्सास येथे घडला आहे. येथे प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एका प्रेमविराने थेट पर्वतरांगा गाठल्या. पण तिथपर्यंत पोहचताना त्यांची पुरती दमछाक तर झालीच शिवाय अन्नपाण्यावाचून उपाशी मरण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण सुदैवाने तिथे आलेल्या एका ट्रेकर्सच्या ग्रुपने त्यांना वाचवले व रुग्णालयात दाखल केले. जोशुआ मैसन (27) आणि केटी डेविस( 28) अशी या दोघांची नावे आहेत.
जोशुआ आणि केटी यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध असून जोशुआला लग्नाची घाई होती. पण केटीने मात्र त्याला घाई न करण्याचे सांगितले. यामुळे भविष्यात केटी आपल्याला सोडून जाऊ शकते अशी भीती जोशुआला वाटायला लागली. त्यातूनच मग त्याने केटीवर छाप पाडण्यासाठी नवीन शक्कल लढवली. केटीला उंच पर्वतरांगांवर फिरायला न्यायचे व तिथेच तिला लग्नाची मागणी घालायची असे त्याने ठरवले. पण त्याने केटीला आपण फक्त जैसपर पर्वतावर फिरायला जाऊया असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी दोघेजण विमानाने कोलाराडोला गेले. पर्वतमध्यावरील एका रमणिय ठिकाणी जोशुआला केटीला लग्नाची मागणी घालायची होती. यामुळे शनिवारी त्यांनी पर्वत चढायला सुरूवात केली. पण अर्ध्यावर पोहचेपर्यंत दोघांची पुरती दमछाक झाली. त्यांच्याजवळचे पाणी व खाण्यापिण्याचे पदार्थही संपले. यामुळे केटीने जोशुआला परत जाऊया असा सल्ला दिला. पण जोशुआला केटीला त्या ठराविक ठिकाणीच न्यायचे होते. यामुळे तो थांबण्यास तयार नव्हता. यामुळे नाईलाजाने केटीही त्याच्यामागे जात होती. अखेर काही अंतर गेल्यानंतर दोघांच्या शरीरातले त्राण गेले. पाणी व अन्नावाचून दोघेही तळमळू लागले. त्यातच दिवस मावळू लागल्याने सगळीकडे काळाकुट्ट अंधार पडला. यामुळे दोघांनाही नेमके कुठे जावे ते कळेना . ते वाट दिसेल तिथे जाऊ लागले आणि रस्ता भरकटले. आपण रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर दोघे तिेथेच बसून रडू लागले. याचवेळी जोशुआने केटीला लग्नाची मागणी घातली आणि तिने त्याला लगेच होकारही दिला.
पण त्यानंतर अंधारात खाली उतरणे दोघांनाही शक्य नव्हते. यामुळे अन्नपाण्याविणा तडफडत त्यांनी संपूर्ण रात्र पर्वतमध्यावर काढली. सुदैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकरर्सच्या एका ग्रुपची नजर बेशु्द्ध पडलेल्या जोशुआ व केटीवर पडली. त्यांनी त्यांना शुद्धीवर आणले व अन्न पाणी दिले. त्यानंतर ट्रकेर्सनी बचाव पथकाला याबद्दल कळवले. त्यानंतर या दोघा प्रेमीयुगलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.




























































