
सामना ऑनलाईम,मुंबई
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व, आभाळाएवढे ज्यांचे कर्तृत्व, अदबीने ज्यांच्यापुढे झुकती साऱ्यांच्या नजरा, त्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘मानाचा मुजरा’ करण्यासाठी सोमवारी एक ऐतिहासिक सोहळा होणार आहे.
‘ठाकरे’ हा शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि कलर्स मराठी वाहिनीने हा सोहळा आयोजित केला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विक्रमादित्य सुनील गावसकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विनोद कांबळी, अभिनेता संजय दत्त, शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राजू श्रीवास्तव हे मान्यवर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे, असे वाहिनीतर्फे सांगण्यात आले.





























































