
सामना ऑनलाईन । बँकॉक
थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ आपल्या प्रशिक्षकासह गायब झाला होता. तब्बल नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हा संघ सापडला असल्याची माहिती चियांग राय प्रांताचे राज्यपाल नारोंगसाक ओसोट्टानाकोर्न (Narongsak Osottanakorn) यांनी दिली आहे. १२ किशोरवयीन फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकाचा शोध घेण्यात यश आले असून लवकरच त्यांना गुहेमधून बाहेर काढण्यात येईल असे बचाव पथकाने म्हटले आहे. परंतु गुहेमध्ये साचलेले पाणी आणि दलदलीमुळे फुटबॉसपटू आणि प्रशिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान अजूनही बचाव पथकापुढे कायम आहे.
Thai football team lost for nine days in cave ‘found safe’: governor ( AFP)
— ANI (@ANI) July 2, 2018
नऊ दिवसांपूर्वी थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या थाम लुआंह नांग नोन गुहेमध्ये गेल्या थायलंडच्या किशोरवयीन फुटबॉल संघातील ११ ते १६ वर्ष वयोगटातील १२ खेळाडू आणि २५ वर्षीय प्रशिक्षक गायब झाले होते. प्रचंड पाऊस आणि भू-स्खलनामुळे गुहेमध्ये हा संघ अडकला होता. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्य सापडले होते, त्यानंतर खळबळ उडाली होती.

























































