थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा – सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक

सात्विकासाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता जेतेपदाच्या लढतीत या हिंदुस्थानी जोडीची गाठ चेन बो यांग व लियू यी या चिनी जोडीशी पडेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत चेन बो यांग व लियू यी या चिनी जोडीने दक्षिण कोरियाच्या किम गी जंग व किम सारंग या जोडीचा 21-19, 21-18 असा पराभव करीत आगेकूच केली.

आशियाई सुवर्णपदक विजेत्या सात्विक-चिराग या तृतीय मानांकित जोडीने उपांत्य लढतीत लू मिंग-चे व तांग काई-वेई या चिनी तैपेईच्या जोडीचा अवघ्या 35 मिनिटांच्या लढतीत 21-11, 21-12 असा फडशा पाडला. या लढतीत हिंदुस्थानी जोडीने पहिल्या मिनिटापासून वर्चस्व गाजविले.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 3-0 अशी आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानी जोडीला चिनी तैपेईच्या जोडीने 5-4 असे पिछाडीवर टाकले होते. मात्र, त्यानंतर सात्विक-चिराग जोडीने 11-7 व नंतर 17-10 अशी मोठी आघाडी घेत पहिला गेम सहज जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये काही वेळ संघर्ष बघायला मिळाला. उभय जोड्यांमध्ये आधी 4-4, तर नंतर 6-6 अशी बरोबरी झाली. मग चिनी तैपेईच्या जोडीने 9-7 अशी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर हिंदुस्थानी जोडीने लढतीत जबरदस्त पुनरागमन करीत लढत आठ गुणांची कमाई करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.