ठाणे पालिकेचा वादग्रस्त फरार माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादग्रस्त माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याला आज पहाटे कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. आहेर याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार होता. अखेर आज पहाटे त्याला कोल्हापूरमधून अटक करण्यात आली असून त्याचा ताबा घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या डेटा एण्ट्री ऑपरेटर महिलेने त्याच्याविरोधात 20 एप्रिलला कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. महेश आहेर याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत तक्रारदार महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केल्याचाही आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे नाव समोर आले आहे. आहेर याने तक्रारदार महिलेला नाशिक येथे नेऊन अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला.

लॉजमध्ये आहेर लपून बसला होता

अटक टाळण्यासाठी आहेर याने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र काही तासांतच तो मागे घेतला. कोल्हापूर शहरातील एका लॉजमध्ये आहेर लपला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.

शुक्रवारी न्यायालयात हजर करणार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. शुक्रवारी आहेर याला ठाण्यात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. याबाबत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दुजोरा दिला आहे.