ठाणे-बेलापूर प्रवास आता होणार सुपरफास्ट; नवी मुंबई पालिका उभारणार तीन नवे फ्लायओव्हर

सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. या मार्गावर तीन महाकाय उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. या पुलांवर आणि अन्य कामांवर एकूण ९०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तुर्भे परिसरात हा मार्ग सायन-पनवेल मार्गाला मिळत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होते. ती फोडण्यासाठी बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूमदरम्यान डबलडेकर पूल तयार करण्याच्या हालचालीही महापालिकेने सुरू केल्या आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. संध्याकाळी रबाळे आणि ऐरोली परिसरात वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावर प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही संभाव्य वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालि का प्रशासनाने ठाणे-बेलापूर मार्गावर तीन ठिकाणी महाकाय उड्डाणपूल उभा करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार किस्ट्रल हाऊस ते पावणे गाव, रबाळे जंक्शन आणि बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूम यादरम्यान हे तिन्ही पूल उभारण्यात येणार आहेत.

क्रिस्टल हाऊस आणि रबाळे जंक्शन येथील पुलांवर अनुक्रमे ११० आणि १७१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूमदरम्यानचा पूल सर्वाधिक लांबीचा असल्याने त्याच्यावरील खर्च सुमारे ३३८ कोटींपर्यंत जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका या मार्गावर उभारणाऱ्या तिन्ही पुलांसाठी अंदाजे सुमारे ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या हॅम्प योजनेतून निधी उपलब्ध होणार आहे.

तुर्भे स्टोअर्स येथील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडी फुटणार असली तरी पुढे तुर्भे नाका येथे वाहतूककोंडी होणार आहे. ती फोडण्यासाठी या ठिकाणी डबलडेकर पूल तयार करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावर हे तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या कामाचे इस्टिमेट तयार केले जाणार असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

अहवाल सादर करण्याचे निर्देश
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ठाणे-बेलापूर मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन उड्डाणपुलांचाही समावेश आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.