
कोरोनाच्या आपत्ती काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षे उलटून गेल्यानंतरही कोरोना भत्ता मिळालेला नाही. ठाणे महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना भत्ता मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी या प्रकरणाला वाचा फोडली असून शुक्रवारी होणाऱ्या महासभेत कोरोना भत्ता देण्याबाबत प्रश्न सादर केला आहे. त्यामुळे महासभेत कोरोना भत्त्यावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
कोरोना आपत्तीच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेबरोबरच विविध विभागात काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. ठिकठिकाणच्या वस्त्यांच्या सर्वेक्षणाबरोबरच आरोग्य तपासणी, रुग्णालयातील सेवा आणि इतर कामांसाठी पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. या काळात कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर दुर्दैवाने काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, तर अनेक जण आजारी पडले होते.
कोरोना आपत्तीच्या काळात केंद्र व राज्य आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम केल्याबद्दल कोरोना भत्ता जाहीर करण्यात आला होता. मात्र महामारी उलटून चार वर्षे झाली तरी त्या कर्मचाऱ्यांना कोरोना भत्त्याची फुटकी कवडीही मिळाली नाही.

























































