ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार

ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चारही लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचाच आवाज घुमला. ठाणे, पालघर, कल्याणमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत भाजप आणि मिंधे गटात सुरू असलेली चढाओढ, मिंधे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात भाजप कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ यामुळे प्रचंड खदखद आहे.

शिवसेना महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेला प्रचार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तडाखेबंद सभांमुळे विरोधकांना हादरे बसले आहेत. त्यामुळे जुमलेबाज भाजप, मोदींची हुकूमशाही आणि गद्दार मिंध्यांना अस्मान दाखवत लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून वैशाली दरेकर-राणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे आणि पालघरमधून भारती कामडीच विजयाचा झेंडा फडकवतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

भिवंडी लोकसभेत कपिल पाटलांची बिघाडी, बाळ्यामामांची आघाडी

मिनी मँचेस्टर अशी ओळख असलेल्या भिवंडीत महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे विरुद्ध महायुतीचे कपिल पाटील यांची लढत होत आहे. खासदारकीची संधी मिळूनही कपिल पाटील यांचा जनसंपर्काचा अभाव ही त्यांची तुटीची बाजू आहे. भिवंडीत टोरंटो पॉवर ही कंपनी भिवंडीतील सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड लूट करत असल्याचे सांगत भिवंडीकरांनी या कंपनीवर अनेकदा धडक आंदोलने केली. मात्र कपिल पाटील यांनी या कंपनीचीच बाजू घेतली. पाटील यांनी भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना अपमानित केल्याची भावना कथोरे समर्थकांत आहे. पाटील यांनी चक्रे फिरवून कथोरे यांचे भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतले. या अवमानाची मुरबाडच्या भाजप कार्यकर्त्यांत अंतर्गत खदखद आहे. पाटील यांनी प्रचाराच्या बैठकीसाठी बोलावूनही मुरबाडचे 16 कथोरे समर्थक नगरसेवक गेलेच नाहीत. त्यामुळे या नाराजीचा उघड फटका पाटील यांना बसणार असल्याचे बोलले जाते.

भिवंडी रोडवरील वाहतूककोंडीस नागरिक कंटाळले आहेत, पण ही समस्या सोडवण्याकडे पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. गोदाम पट्ट्यातील टक्केवारीच्या राजकारणाचा फटकाही त्यांना बसणार असल्याचे बोलले जाते. याउलट महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना केलेल्या विकासकामांचे दाखले आजही दिले जात आहेत. त्यांच्या ‘गोदाम वर्ल्ड’मध्ये त्यांनी हजारो स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बाळ्यामामांच्या प्रचारात झोकून दिले आहे. भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण पश्चिम आणि भिवंडी शहरात बाळ्यामामांच्या प्रचाराचा आवाज घुमत आहे. तिसरे अपक्ष उमेदवार निलेश सांबरेही प्रचारात मागे पडले आहेत.