180 च्या वेगात ‘लॅण्ड क्रुझर’ झाडावर आदळली; एकाचा जागीच मृत्यू, चालक तरुणी जखमी

भल्या पहाटे मोकळ्या रस्त्यावर तब्बल 180 च्या स्पीडमध्ये सुसाट निघालेली भरधाव लॅण्ड क्रुझर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली. या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी तर सहप्रवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उपवनजवळ रौनक पार्क सोसायटीसमोर घडली. तीव्र उतार असलेल्या या रस्त्यावर गाडीसमोर कुत्रा येताच चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे अपघात घडला, अशी माहिती जखमी कारचालक तरुणीने पोलिसांना दिली.

मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला, चालक नशेत होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघाताने ठाण्यातील रस्त्यांवर भरधाव धावणाऱ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोखरण रोड क्रमांक दोन येथील वसंतविहार सोसायटीत राहणारे सुमित ढाकणकर (33) उन्नती वुडमध्ये राहणारी त्यांची सहकारी शिवानी भानुशाली (25) यांच्यासोबत लॅण्ड क्रुझर कारमधून बुधवारी पहाटे उपवनकडून पवारनगरच्या दिशेला जात होते. यावेळी शिवानी कार चालवत असताना रौनक पार्क सोसायटीसमोरील ओपन जिम आधी त्यांच्या कारसमोर कुत्रा आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट पदपथावरून पुढे जात झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीतील सुमित यांचा जागीच मृत्य झाला. तर कारचालक शिवानी अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालकाची रक्त तपासणी करण्यात आली असून त्याचे अहवाल समोर येताच त्यांनी मद्यपान केले होते का, याबाबत स्पष्टता होईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या