
ठाणे जिह्यात एका वर्षात कुष्ठरोगाचे 676 रुग्ण आढळले आहेत. ठाणे शहरासह कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जंतूंचा फैलाव होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.
ठाण्यातील वाढत्या कुष्ठरुग्णांचा प्रश्न सदस्य रवींद्र फाटक यांनी विचारला. त्यावरील लेखी उत्तरात आरोग्यमंत्री टोपे यांनी ठाणे जिह्यात कुष्ठरोगाचे 676 रुग्ण असल्याचे जानेवारी 2020 मध्ये निदर्शनास आल्याचे सांगितले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा राज्य आणि जिल्हास्तरीय सभेत कार्यक्षेत्र निहाय नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शहरी भागात आणि ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत संशयित रुग्ण शोधण्यात येतात. नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या सोबत राहणाऱया व्यक्तींची तपासणी केली जाते, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.





























































