मारुती जाधव ठरला ‘ठाणे महापौर चषक’चा मानकरी

284

सांगलीचा मारुती जाधव ठाण्याच्या खारकर आळीतील शक्तिस्थळ येथे झालेल्या अंतिम कुस्ती सामन्यात कोल्हापूरच्या सिकंदर शेखला चीतपट करून ठाणे महापौर चषकचा विजेता ठरला, तर महिलांच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेने पुण्याच्या मनीषा दिवेकर हिला अस्मान दाखवले. तीन दिवस ठाणे पालिकेने केलेल्या दिमाखदार आयोजनाने कुस्तीरसिकांच्या उत्साहात भर पडली.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या वतीने महापौर कला-क्रीडा महोत्सवांतर्गत ‘ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा’ आयोजित केली होती. अंतिम लढतीत सुरुवातीला सिकंदरने आक्रमक पवित्रा घेत दोन गुणांची कमाई केली, पण त्यानंतर लगेच लढत सुरू असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पंचांनी मारुती जाधव याला विजयी घोषित करून विजेता ठरवले, तर महिला खुला गटातील कोल्हापूरच्या सृष्टी भोसले हिने 5-4 अशा गुणांनी मनीषा दिवेकर हिला हरवले. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवले. यावेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते अशोक कैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी महापौर स्मिता इंदूलकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, माजी नगरसेवक पवन कदम, आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होत्या.

कुस्तीसाठी स्वतंत्र संकुल उभारणार

ठाणे पालिका ही राज्यात नव्हे, तर खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारी देशातील पहिली पालिका आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली असून हे संकुल लवकरच उभारण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या