कासारवडवली ते गायमुख मेट्रोचे काम सुरु

667
फाईल फोटो

 मेट्रो प्रवासाचे ठाणेकरांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार असून कासारवडली ते गायमुखदरम्यानच्या कामासाठी कंत्राटदारही नेमला आहे. जे कुमार इफ्राप्रोजेक्टस लिमिटेड  या कंपनीने मेट्रोचे शिवधनुष्य उचलले असून आज गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पहिली कुदळही टाकण्यात आली. या मेट्रोमुळे ठाणेकरांची वाहतूककोंडी दूर होणार असून पहिल्या टप्प्यात कंत्राटदाराला 342 कोटी रुपये दिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शानदार सोहळ्यात मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कासारवडवली ते गायमुख मेट्रोचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून आज झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत कंत्राटदारास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कासारवडवली ते गोविंदवाडा व गोविंदवाडा ते गायमुख यादरम्यानचे स्थापत्य काम कंत्राटदारामार्फत केले जाणार आहे.

कासारवडवली ते गायमुख हा 2.7 किलोमीटर लांबीचा मार्ग असून   तो वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग क्रमांक चारशी संलग्न आहे. या मार्गावर रोज 1 लाख 3 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एमएमआरडीएची या प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितले. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मेट्रो प्रकल्प साकारला जात आहे.

मीरा-भाईंदर मेट्रोचे कामही सुरू 

मीरा-भाईंदरमधील मेट्रोच्या कामालाही आजपासून प्रारंभ झाला असून  हा मार्ग दहिसर मेट्रोला जोडला जाणार आहे. 12 किलोमीटरच्या या पट्टय़ात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरा गाव, काशी गाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग गार्डन, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशी स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी 6 हजार 660 कोटी रुपये खर्च होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या