
महापालिका निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीविरोधात तगडी झुंज दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावरील २० उमेदवारांचा कमी फरकाने विजय हुकला आहे. प्रभाग क्रमांक ३, ९, ११, १२, १३, २०, २४, २६, ३१ व प्रभाग क्रमांक ३३ मधील महाविकास आघाडीतील उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे या ठिकाणी विजयी झालेल्या महायुतीचे उमेदवार शेवटच्या फेरीपर्यंत चांगलेच टेन्शनमध्ये आले होते.
प्रभाग क्रमांक ३ च्या पॅनलमधील महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना कडवी झुंज दिली. यातील ‘ड’ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जयनाथ पूर्णेकर यांनी शिंदे गटाचे विक्रांत वायचळ यांना चांगलाच घाम फोडला. या लढतीत त्यांचा फक्त १५८ मतांनी पराभव झाला, तर प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधील शिवसेनेच्या संजय दळवी यांनी शिंदे गटाविरोधात दंड थोपटले. मात्र त्यांचा २४६ मतांनी पराभव झाला.
ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात
प्रभाग क्रमांक ३३ येथे महाविकास आघाडीच्या पॅनलमधील चारही उमेदवारांनी धडाकेबाज कामगिरी बजावली. मात्र या लढतीत ३३ ‘अ’ मध्ये राष्ट्रवादीचे खांचे मोहम्मद जैद अतिक खांचे यांचा ५७८ मतांनी, ‘ब’ मध्ये राष्ट्रवादीच्या सलमा अन्सारी यांचा एक हजार १८९, ‘क’ मध्ये सुरमे यासीन यांचा ६८४ तर ‘ड’ मध्ये समीर खान यांचा ५७७ मतांनी पराभव झाला.































































