महापालिकेचा कारनामा, ठाण्यात मलजल प्रकल्पाचा घोटाळा; काम न करताच कंत्राटदाराच्या घशात दोन कोटी

कोपरी येथे चेन्नई व नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक मलजल प्रकल्प उभारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला होता. मात्र गेल्या तीन वर्षांत या प्रकल्पाची एक वीटही उभारलेली नाही. हा संपूर्ण प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. तरीदेखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दोन कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिकेचा हा कारनामा उघडकीस आल्याने अधिकारी व कंत्राटदार यांची चांगलीच तंतरली आहे.

ठाण्यातील आठही प्रभागांमध्ये वाहून आणलेल्या मलयुक्त पाण्यावर कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीमध्ये सोडून दिले जात होते. ते पाणी शुद्ध करून वापरण्यायोग्य करण्याकरिता पीपीपी तत्त्वावर विशेष प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला. याच प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मितीही करण्यात येणार होती. मेसर्स व्ही. व्ही. वाबाग लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांचा पालिकेने कार्यदिशदेखील दिला. ठेकेदाराने कार्यदिश दिल्यापासून 24 महिन्यांत प्रकल्पाची अंमलबजावणी करावयाची होती. या काळात सहा महिन्यांत प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेणे आणि उर्वरित महिन्यांत प्रकल्प बांधून कार्यान्वित करणे अशी जबाबदारी असताना अजूनपर्यंत एकाही एकाही कामास सुरुवात झालेली नाही. अटीशर्थीचे उल्लंघन करून कंत्राटदाराला दोन कोटी दिलेच कसे, असा थेट सवाल ठाणेकरांनी केला आहे.

सक्षम प्राधिकरणाची मंजुरीच नाही

निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रकल्पासाठी मे. व्ही. ए. टेक वाबाग लि. या कंपनीने मे. ग्रेडियंट इंडिया प्रा. लि. यांच्या सोबतीने मे. कोपरी बायो इंजिनीयरिंग प्रा. लि. नावाने विशेष कामासाठी फर्म बनवली. तसेच या फर्मसोबत करारनामादेखील करण्यात आला. दरम्यान हे करताना सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.

हा तर उघड भ्रष्टाचार

प्रत्यक्ष काम पूर्ण झाले नसतानाही ठेकेदाराला दोन कोटी रुपये देणे ही बाब म्हणजे उघड भ्रष्टाचार आहे. तत्कालीन आयुक्तांचीदेखील मंजुरी घेण्यात आली नव्हती. संबंधित कंत्राटदाराने अनेकदा अंतर्गत बदल केले, पण त्यास मंजुरी नसतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन कोटींचे बिल कोणत्या तत्त्वावर दिले, असा सवाल भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

8 कोटी 44 लाखांचे देयक सादर

मल-जल प्रकल्पाचा ठराव व्ही.ए.टेक वाबाग लि. या कंपनीच्या नावे मंजूर असताना कोपरी बायो इंजिनीयरिंग प्रा. लि. नावाने देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर 2022 ते जुलै 2023 या कालावधीचे 8 कोटी 44 लाख 57 हजार 899 रुपयांचे देयक सादर करण्यात आले आहे. हे देयक ए. के. इलेक्ट्रिकल्समार्फत सादर करण्यात आले आहे. मे. कोपरी बायो इंजिनीयरिंग प्रा. लि. आणि ए.के. इलेक्ट्रिकल्स यांचा संबंध काय, असा सवाल विचारण्यात आला आहे.