ठाण्यात आश्चर्य! लॉकडाऊन उठला आणि गर्दीच ओसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाही लॉकडाऊनमध्ये रिकाम्या पिशव्या मिरवत गर्दी करणाऱ्या ठाणेकरांनी अनलॉक होताच बाजारपेठांमध्ये कमालीची ‘एक्झिट’ केल्याचे आश्चर्यकारक चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दोन-अडीच महिन्यानंतर ऑफिस गाठण्यासाठी लगबग सुरू झाल्यामुळे, गर्दी ओसरल्याचा सुखद धक्का मिळाला असून गजबजलेल्या बाजारपेठ यांनी मोकळा श्वास घेतला.

लॉकडाऊनमध्ये ठाण्यातील जांभळी नाक्यासह सर्व प्रमुख बाजारपेठा आणि छोट्या-मोठ्या गल्ली गोळ्यांमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडताना नेहमीच दिसला. गर्दी हटवण्यासाठी कधी बळाचा, तर कधी हात जोडून, आरती ओवाळून पोलिसांनी आवाहन केले पण गर्दी ओसरली नाही. लॉकडाऊनमध्ये अशी परिस्थिती होती तर अनलॉक होताच काय गोंधळ उडेल या विचाराने पोलिस यंत्रणेची झोप उडाली होती. मात्र घडले उलटेच, अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी बाजारांची परिस्थिती पाहता आश्चर्याचा धक्का बसला. खरेदीसाठी लोकांची गर्दी नाही, संपूर्ण रस्ता खुला, सर्वत्र शुकशुकाट. यामुळे स्पीकरवर सोशल डिस्टंसिंग पाळा असे ओरडणाऱ्या पोलिसांच्या गळ्याला अडीच महिन्यानंतर आराम मिळाला. अनलॉकचा असाही सकारात्मक परिणाम होऊ शकतो हा अनुभव आश्‍चर्यकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवीन सुरुवात, नवे आव्हान
पुनश्च श्री गणेशा करत चाकरमानी नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडले आहेत. छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाल्याने लॉकडाऊन मुळे ठप्प झालेले रुटीन पुन्हा सुरू झाले आहे. जो-तो आपापल्या कामात गुंतल्यामुळे विनाकारण बाजारपेठांमध्ये जमणारी गर्दी ओसरल्याची असल्याची शक्यता आहे. पण हा बदलही स्वागतार्ह असून, आता नवीन सुरुवात करताना ठाणेकरांनी प्रवासादरम्यान आणि कामावर सोशल डिस्टंसिंग पळून कोरोनाला दूर ठेवण्याचे नवे आव्हान ताकदीने पेलण्याची आवश्यकता असल्याचे ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.