रहिवाशांना जबरदस्ती घराबाहेर काढले; भाडेही लटकवले, एकनाथ शिंदेंच्या सगेसोयऱ्यांकडून दौलतनगरचा प्रकल्प काढून घ्या! अंजली दमानिया यांची मागणी

कोपरीतील दौलतनगर सोसायटीचा पुनर्विकास करताना येथील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले असून त्यांचे ९ महिन्यांचे भाडेदेखील बिल्डरने लटकावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. त्यामुळे या प्रकल्पाचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक लक्ष्मण कदम यांच्याकडून काढून घ्या, त्यांच्या जागी म्हाडासारख्या एजन्सीला नेमून प्रकल्पाचे काम पूर्ण करा, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

दौलतनगर सोसायटीच्या रहिवाशांची आज सकाळी दमानिया यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. दमानिया यांनी या प्रकल्पावरून जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, चांगल्या इमारती असूनही त्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या, ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागले. सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत मी अनेकवेळा एकनाथ शिंदे यांना मेसेज केले, फोनदेखील केले. ज्यांची विकासक म्हणून निवड करण्यात आली आहे ते लक्ष्मण कदम हे एकनाथ शिंदे यांचे व्याही असून ते रहिवाशांना त्रास देत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

इमारतीच्या पुनर्विकासासाठी २०१६ मध्ये सोसायटीने मे. यश अशोका या विकासकाची नियुक्ती केली. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये अॅग्रीमेंट करण्यात आले. आता लक्ष्मण कदम आणि विपुल कदम यांची अचानक विकासकाच्या भागीदारात एण्ट्री झाली. त्यानंतरचा क्लस्टर ठराव मंजूर झालेला नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

विकासकाची निवड ही रहिवाशांच्या एकमतानेच केली असल्याचा दावा सोसायटीचे सभासद जयप्रकाश कोटवानी यांनी केला आहे. काही ठरावीक लोकांचे मतभेद असतील तर ते दूर केले जातील, असेही कोटवानी यांनी सांगितले.

गेल्या नऊ महिन्यांपासून या रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळाले नव्हते. मात्र दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेताच रहिवाशांना भाड्याचे धनादेश वाटण्यात आले. सभासदांकडून मात्र हा योगायोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.