प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा डांबरी रस्ता उखडून नेला, झाई-बोरीगावमध्ये घडला संतापजनक प्रकार

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील झाई-बोरीगाव परिसरात तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता उखडून नेण्यात आला आहे. रस्ता तयार होऊन काही महिने लोटले नाही तोच तो पुन्हा खोदण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रम वाढला आहे. विशेष म्हणजे रस्ता खोदल्यानंतर निघालेला मुरूम आणि मातीही गायब करण्यात आली आहे.

झाई-बोरीगाव ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या दुबळपाड्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बनवलेला सुमारे आठशे मीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे खोदकाम करून माती डंपरमध्ये भरून नेण्यात आली. नवीन रस्त्याच्या कामासाठी जुना डांबरी रस्ता खणला जात असेल असे वाटून ग्रामस्थांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही नवीन रस्ता होत नसल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत.

तसेच एक लेखी तक्रार तलासरी पंचायत समितीकडेसुद्धा केली आहे. या प्रकाराविषयी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व पाड्यातील सदस्याला विचारले असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. हा खोदलेला रस्ता जर नव्याने तयार झाला नाही तर पावसाळ्यात गावामध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाण्याची पाइपलाइन फुटली

या रस्त्याचे खोदकाम करताना पाड्यातील पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुबळपाडा हा आदिवासी लोकवस्ती असलेला सुमारे शंभर घरांचा पाडा आहे. येथील बहुतांश कुटुंबे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मात्र पाड्यात दोन महिन्यांपासून पाणी येत नसल्याने त्यांना 60 रुपयाला एक पिंप या दराने पाणी विकत घ्यावे लागते. या समस्येची तक्रार करूनही ग्रामपंचायत पाड्यातील पाइपलाइन दुरुस्त करून देत नसल्याने येथील महिलावर्गात संतापाची लाट उसळली आहे.