
परतीच्या पावसाने पालघर, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या धुवांधार पावसामुळे शेतकऱ्यांची ‘लक्ष्मी’ मातीमोल झाली असून उभी पिके पाण्यात आडवी झाली आहेत. या अस्मानी संकटाने तिन्ही जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
भातशेतीचा चिखल झाल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला आहे. त्यामुळे आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न लाखोंच्या पोशिंद्याला पडला आहे. दरम्यान, इतकी भयंकर परिस्थिती असताना नुकसानभरपाईच्या नावाखाली पंचनाम्यांचा फार्स करणाऱ्या महायुती सरकारला पाझर फुटणार कधी, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
भाताच्या लोंब्या कुजल्या
पालघर जिल्ह्यात यावर्षी ७६ हजार ६६८ हेक्टरवर भात लागवड केली आहे. ठाणे जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर तर रायगडात सर्वाधिक ८१ हजार ३३५ हेक्टरवर जवळपास भाताची लागवड केली गेली आहे. यंदा सुरुवातीला पाऊस समाधानकारक झाल्याने पिके जोमात आली होती. मात्र परतीच्या पावसाने घात केला असून पिके पाण्यात आडवी झाल्याने भाताच्या लोंब्या कुजल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळत आहे.
- ऐन कापणीच्या हंगामात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश भागात उभी पिके आडवी होऊन अक्षरशः पाण्यात लोळत आहेत.
- खाडी पट्टयात तर ही परिस्थिती भयंकर आहे. केलेला खर्च तरी निघेल की नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- अगोदरच बी-बियाणे, अवजारे आणि वाढती मजुरी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना आता पावसाने दगा दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
- शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- पालघरमधील वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण तसेच रायगड जिल्ह्यातील पेण, रोहे, महाड, माणगाव, कर्जत या तालुक्यांमध्ये शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.




























































