
जवळजवळ पाच तपं विश्वातील कोट्यवधी लोकांना भावमुग्ध करणारे, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, संतवाणी, अशा सर्व माध्यमातून गानरसिकांचेभावविश्व समृद्ध करणारे भारतीय संगीताचा मानदंड, संगीतविश्वाचा स्वरभास्कर म्हणजेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी. पंडितजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पं. फिरोझ दस्तूर मेमोरियल फाउंडेशन तर्फे ठाण्याच्या सहयोग मंदिर, दुसरा मजला येथे तीन दिवसीय ( दि. 25, 26 व 27 फेब्रुवारी. या दिवशी रोज सायंकाळी 6 ते 9) शास्त्रीय संगीत समारोहाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. समस्त ठाणेकरांसाठी हा एक अपूर्व योग आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने किराणा घराण्याचे अध्वर्यू गायक पं. फिरोझ दस्तूर ह्यांच्या ‘घट घट मे संगीत समाए’ या चरित्र ग्रंथाचे ( लेखक श्री सुनील परांजपे ) , तसेच ‘चंद्रमुखी’ या स्वरचित बंदिशाच्या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. पं भीमसेनजी यांचे नातू विराज जोशी आणि सुपुत्र पं. श्रीनिवास भीमसेन जोशी हे आपली गायनकला पेश करणार आहेत. यांच्याबरोबच पं आनंद भाटे, पं उपेंद्र भट, सुचिता आठलेकर, गिरीश संझगिरी हे दिग्गज गायक देखील वेगवेगळ्या दिवशी आपली गायनकला पेश करणार आहेत. त्यांना तबला साथ करणार आहेत पं. मुकुंदराज देव, पं. गिरीश नलावडे आणि पं माधव वर्तक तर संवादिनीवर असणार आहेत पं. प्रभाकर पांडव, पं श्रीनिवास आचार्य आणि पं अतुल फडके. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत अभय इनामदार.
या तीन दिवसीय कार्यक्रमाला समस्त मान्यवर रसिकांनी कोविडचे नियम पाळून उपस्थित रहावे,असे आवाहन पं. फिरोझ दस्तूर मेमोरियल फाउंडेशन यांनी केले आहे.























































