
ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो घरांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, विरार, पनवेल, पेण येथे अनेक झाडे कोसळली. त्यात वाहनांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान उल्हास नदीचे पाणी अंबरनाथ ते बदलापूर दरम्यानच्या ट्रकवर आल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प होती.
दोघांना वाचवले
उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विकी पुजारी (26) व अजय वाल्मीकी (30) या दोघांना टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वाचवले.
20 झाडे कोसळली
ठाणे शहराच्या विविध भागात 20 हून अधिक झाडे कोसळली. त्यातील काही झाडे चारचाकी व दुचाकींवर कोसळल्याने एकूण दहा वाहनांचे नुकसान झाले. पाचपाखाडी येथे एका सोसायटीची पंधरा फुटाची सुरक्षा भिंत कोसळली.
पालघर जिल्ह्याला झोडपले
पालघर जिल्ह्यालाही दिवसभर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पालघर स्टेशन ते उमरोळीदरम्यान रुळावर पाणी साचल्याने पॉइंट फेल झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. माकुणसार मैदान येथे पाणी साचल्याने सफाळेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. वसई-विरारमध्ये धुवांधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
अंबा नदीच्या पुराचे पाणी नागोठणे गावातील असंख्य घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ, कोळीवाडा, मटण मार्केट, हा परिसर पाण्याखाली होता.
बदलापूरच्या सोनिवली व हेंद्रेपाडा येथील दोनशे कुटुंबांना बीएसयुपीच्या इमारतींमध्ये हलवण्यात आले.
कल्याणच्या रायते येथील पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण-मुरबाड महामार्ग बंद केला.
रायगडातील रसायनी, चिरनेर, आपटे जोहे, माटवण, मिळखत खार अशा अनेक गावांना पुराचा फटका.
उल्हासनगरच्या वालधुनी नदीचे पाणी सम्राट अशोकनगर, भरतनगर, रेणुका सोसायटी, चांदीबाई कॉलेज परिसर, काजल पेट्रोलपंप येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
अतिवृष्टीमुळे महाड-पोलादपूर पाण्याखाली असून बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱयांचे नुकसान झाले.
कोल्हापुरात पंचगंगेचे रौद्र रुप
पंचगंगेच्या पाणीपातळीत 10 फुटांची वाढ झाली. त्यामुळे एकूण 47 बंधारे पाण्याखाली गेले असून पुढचे दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयनानगर परिसरात पाणी साचल्यामुळे कोडोली ते संगनगर रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
चंद्रपूरमध्ये 150 गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 16 मार्ग बंद पडून सुमारे दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला असून शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
एनडीआरएफच्या दिमतीला पिंकी
चिपळूणमध्ये कुंभार्ली घाटाची पाहणी करण्यात आली. दरडी कोसळतात त्या ठिकाणी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले. या पथकात एका लॅब्राडॉर जातीच्या कुत्रीचा समावेश आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक घटनांमध्ये पिंकीने अनेकांचे जीव वाचवले आहेत. एखादा जिवंत माणूस जमिनीखाली गाडला गेला असला तरी त्याच्या वासाने पिंकी त्याचा अचूक शोध घेते. तिला एनडीआरएफचे जवान प्रवीण पाटील यांनी विशेष प्रशिक्षण दिले आहे.
कोकण रेल्वे सुरू, परशुराम घाट बंद
कोकण रेल्वे व्यवस्थित सुरू आहे. महामार्गावरील वाहतुकीत मात्र पावसाने विघ्न आणले असून दरडी कोसळल्यामुळे दुपारनंतर परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
चिपळुणात वशिष्ठीचे पाणी घुसले
वशिष्ठी नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडून चिपळूण शहरात घुसले असून नाईक कंपनी मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही भाग दिवसभर पाण्याखाली होता.
खेडमध्ये ‘जगबुडी’ आली
खेड शहर आणि ग्रामीण भागात जगबुडी आल्याचेच चित्र आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचे पाणी खेड बाजारपेठेत घुसले आहे.



























































