
सामना प्रतिनिधी। ठाणे
ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभेत फक्त शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचाच आवाज घुमला. चारही लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे रिपोर्टकार्डच जनतेसमोर ठेवले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील फाटाफूट आणि महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेला प्रचार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या झालेल्या तडाखेबंद सभांमुळे विरोधकांचा पालापाचोळा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या लोकसभेत राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि राजेंद्र गावीत हे महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकवतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीला काँग्रेसने सोडले वाऱयावर
ठाण्यात महायुतीचे राजन विचारे यांच्यासमोर महाआघाडीचे आनंद परांजपे लढत आहेत. ठाणे हा महायुतीचा मजबूत गड समजला जातो. राजकीयदृष्टय़ा या मतदारसंघाला संपूर्ण देशात महत्त्वाचे स्थान आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असली तरी प्रचारात मात्र बिघाडी झाली. काँग्रेसचा एकही मोठा नेता परांजपेंच्या प्रचारासाठी फिरकला नाही. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाच वेळ मारून न्यावी लागली. राजन विचारे यांनी केलेली विकासकामे आणि त्यांचा या मतदारसंघाशी असलेला संपर्क आणि अडीअडचणीला धावून जाणारा
खासदार हेच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे ठरणार आहे.
कल्याणमध्ये शिवसेनाच ‘टॉप’
कल्याण लोकसभा मतदारसंघदेखील महायुतीचाच गड असून तेथे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबाजी पाटील यांच्यात लढत होत आहे. मात्र मतदारच कोण हे बाबाजी पाटील असा सवाल करीत असून प्रचारामध्ये महायुतीने आघाडी घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. श्रीकांत शिंदे हे नवखे खासदार असतानादेखील लोकसभेत त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोडविले. त्यांच्या या विकासकामांचा गौरव ‘इंडिया टुडे’ने केला. ते पहिल्याच टर्ममध्ये राज्यातील टॉप फाइव्ह खासदारांमध्ये चमकले हीच त्यांच्या कामाची पोचपावती मतदारांपर्यंत पोहचली आहे.
पालघरमध्ये शिट्टी वाजलीच नाही
पालघरमध्ये महायुतीच्या राजेंद्र गावीत यांची लढत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यासोबत होणार आहे. बविआकडून बळीराम जाधव यांच्या नावाची घोषणा झाली तोपर्यंत गावीत यांनी अर्धा मतदारसंघ ढवळून काढला होता. त्यातच निवडणूक आयोगाने त्यांची शिट्टी ही निशाणीच बाद ठरवली. त्यामुळे बविआचे नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले. त्यांना ऐनवेळी मिळालेली रिक्षा ही निशाणी मतदारांपर्यंत पोहचविताना बविआच्या जाधव यांची अक्षरशः दमछाक झाली. बंदरपट्टीपासून जंगलपट्टीपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार केल्यानेच गावीत याही वेळी लोकसभेत जातील असे चित्र आहे.
वंचित आघाडी मतांपासूनही वंचित राहणार
या चारही लोकसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले खरे पण मतदारांना ना त्यांचे नाव माहीत ना त्यांची निशाणी. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या बिनगर्दीच्या सभा झाल्या तर प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा फज्जाच उडाला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे डिपॉझिट गूल होऊन ते मतांपासून ‘वंचित’ राहतील अशी चर्चा आहे.
भिवंडीत फुटलेल्या काँग्रेसमुळे टावरेंची दमछाक
मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील विरुद्ध आघाडीचे सुरेश टावरे असा मुकाबला होत आहे. या मतदारसंघात आघाडीने शिवसेना-भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. टावरे यांनी यापूर्वी लोकसभेत भिवंडीचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्यांनी या शहरासाठी कोणतेही ठोस काम न केल्याने त्यांना ही निवडणूक जड जात आहे. त्यातच भर म्हणून काँग्रेसच्याच 42 नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. त्याचा फटका टावरे यांना नक्की बसणार आहे.
महायुतीचे शिलेदार
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले होते.
उत्तर-मध्य मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी कुर्ला पश्चिम येथे आयोजित केलेल्या भव्य रोड शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री महादेव जानकर, शिवसेना विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी सहभागी झाले होते.
उत्तर-पूर्व मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार रॅलीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आदी सहभागी झाले होते.
उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी प्रचारादरम्यान बोरिवली येथे रिक्षा चालक-मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी राज्यमंत्री रंजित पाटील, आमदार प्रवीण दरेकर आदी सहभागी झाले होते.





























































