
ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना नेते केदार दिघेंनी शिर्डीतील साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे साईबाबांच्या चरणी घातल्याचं केदार दिघे म्हणाले.
‘मी दिघे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेबांचे कडवट विचार माझ्या रक्तात असल्याचंही त्यांनी म्हटले. देव असल्याशिवाय देवळाला महत्त्व येत नाही, अशी प्रतिक्रिया केदार दिघेंनी प्रतिसेनाभवनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर विश्वास ठेवूनच शिवसेना पुढे जाईल, असंही केदार दिघे म्हणाले.
शिवसेना आणि शिवसैनिक जिथे आहे तिथेच असल्याचे केदार दिघेंनी सांगितले. लोकांना आजही वाटतं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा यावेत, असेही केदार दिघे यावेळी म्हणाले.



























































