
जुन्या सुती साड्या… त्याला अधेमध्ये ठिगळ लावून शिवलेल्या गोधड्या… आई, ताई, आजीच्या मायेची ऊब देणाऱ्या या गोधड्या म्हणजे घराघरात हमखास दिसणारे महाराष्ट्राचे खरे कलात्मक वैभव…. पण आता या गोधड्यांनाही कॉर्पोरेट लुक मिळाला असून रजयांच्या तोडीला तोड देत असल्याचे वाड्यातील बचतगटांनी सिद्ध करून दाखवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी हमरापूरची राणी या नावाने ब्रॅण्ड तयार केला असून त्यांच्या सुंदर, सुबक गोधड्यांची ऊब सातासमुद्रापार गेली आहे. इंग्लंड, अमेरिकेत वाड्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या गोधड्यांना चांगली मागणी आहे.
दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापूर या गावात ओमगुरुदेव महिला बचतगट, भाग्यलक्ष्मी महिला बचतगट, प्रगती ‘अ’ महिला बचतगट, एकविरा महिला बचतगट व साईलीला हे पाच महिला बचतगट आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून कापडी पिशव्यांपासून ते मेकअपचे साहित्य अशा नाविन्यपूर्ण वस्तू बनवल्या जातात. त्यातूनच घराघरात शिवल्या जाणाऱ्या गोधडीला बाजारपेठ मिळवून देण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार तलम सुती कापडाचा वापर करून गोधड्या शिवण्यास सुरुवात झाली. हमरापूर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे शेकडो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. तेथे या बचतगटाच्या महिलांनी शिवलेल्या गोधड्या विक्रीसाठी ठेवल्या. विशिष्ट पद्धतीची शिवण, कलात्मक कलापुसरीमुळे विदेशी पर्यटकांना त्याची भुरळ पडली अन् शंभरहून अधिक गोधड्या पर्यटकांनी बॅगेत भरून सातासमुद्रापार पोहोचल्या. गोधड्यांची मागणी लक्षात घेऊन बचतगटातील प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील यांनी आता वाडा, विक्रमगड या तालुक्यांतील अनेक गावांत प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत.
माजी मंत्री दीपक सावंत यांची भेट
हमरापूरच्या गोधडी प्रकल्पाविषयी माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे सपत्नीक येऊन या प्रकल्पाला भेट दिली. येथील बचतगटातील महिलांशी संवाद साधला. मुंबई येथे झालेल्या लक्ष्मी सरसमध्ये या बचतगटाने 35 हजार रुपयांच्या गोधड्यांची विक्री केल्याबद्दल कौतुक केले. या बचतगटांचे विलेपार्ले येथे लवकरच प्रदर्शन भरवणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाविषयी माहिती देऊन गोधडीसाठी लागणारा कच्चा माल, कापूस, कपडा व मार्केटिंगसाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती करणार असल्याचेही दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा सहसमन्वयक गोविंद पाटील, तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका सचिव निलेश पाटील, शहरप्रमुख नरेश चौधरी, भालचंद्र (बाळू) किणी, स्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.


























































