ठाण्यातील जलवाहतूक पुढील पावसाळ्याआधी सुरू होणार

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली ठाण्यातील जलवाहतूक पुढील वर्षाच्या पावसाळ्याआधी सुरू होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने निधी उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून जेट्टीची कामे पूर्ण होतील. आवश्यक ती सर्व तांत्रिक कामे पूर्ण करून प्रत्यक्षात जलवाहतूक सुरू होईल. त्यामुळे गर्दीवरील ताण कमी होणार असून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर व भिवंडी या 7 महानगरपालिका क्षेत्रातील लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. हा जलमार्ग चालवण्याचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) च्या माध्यमातून चालवण्यात येईल. तसेच ऑपरेटरची नियुक्ती करून राज्य शासन त्याचे नियोजन करीत आहे. ठाण्यातील जलमार्गावर पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जून 2021 पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होणार आहे.

जलवाहतूक विकासकामांच्या प्रगतीबाबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जलमार्गाची माहिती देऊन हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याची विनंती केली. नवी मुंबई येथील नेरूळजवळ जेट्टीचे बांधकाम सुरू असून मांडवा ते मुंबई या धर्तीवर मांडवा ते नेरूळ फेरीबोट सुरू करण्याची विनंती केली. ती लगेच मान्य झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील जलप्रकल्पाबाबत खासदारांची ऑनलाइन बैठक घेण्याची विचारे यांची सूचनाही मान्य झाली आहे.

वसई-ठाणे-कल्याण हा 54 किमी लांबीचा जलवाहतूक मार्गप्रस्तावित असून यामध्ये 10 ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरवण्याचा प्रस्ताव आहे.

ठाणे महापालिकेने 21 कोटी रुपये खर्च करून सविस्तर प्रकल्प तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला होता.

शिवसेनेचे खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन जलवाहतूक प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली होती.

ठाणे महापालिकेस 32 किमी लांबीचा खाडीकिनारा उपलब्ध असल्याने त्याच्यांतर्गत जलवाहतुकीसाठी वापर करता येईल, असा अहवाल ठाणे महानगरपालिकेने २०१६ साली केंद्राकडे सादर केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या