
ई-ऑफिस प्रणालीद्वारे ठाणे जिल्हा परिषद आता पेपरलेस झाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतील १७ हजार १४६ फाईल्स आणि ४६ हजार ५८९ ई-रिसीट्सची (टपाल) नोंद करण्यात आली आहे. या सर्व फाईल्स ऑनलाइन झाल्याने एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रश्न जलद मार्गाने सुटणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्हा परिषदेतील कामकाज पारदर्शक व ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी सर्व विभागातील कारभार ई-ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित करण्यात आला आहे. या पेपरलेस कामासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे युजर आयडी तयार करण्यात आले असून ते ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांशी थेट जोडले गेले आहेत. या ई-प्रणालीमुळे सर्व फाईल्स एका क्लिकवर मिळणार आहेत.
तक्रारींचा निपटारा
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना अर्ज, विनंत्या व तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र अनेकदा कागदपत्रांअभावी त्यांची फरफट होते. मात्र आता डिजिटल प्रक्रियेमुळे निर्णयाला गती मिळणार असून नागरिकांच्या अर्ज, विनंत्या व तक्रारींचा जलद निपटारा होणार आहे.
परिषद प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी बनले आहे. सर्व विभाग पूर्णपणे डिजिटल झाल्यामुळे त्वरित निर्णय घेणे शक्य झाले आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने होत असून डिजिटल बदल हा ठाणे जिल्ह्यासाठी परिवर्तनाचा नवा टप्पा आहे.
अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
























































