
शहरात वाहनांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत पार्ंकग व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. यावर उतारा म्हणून शहरात आणखीन तीन पार्ंकग प्लाझा उभारण्याचे आदेश स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या घोडबंदर, बाळकूम आणि वागळे इस्टेट परिसरात हे तीन पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून ट्रक टर्मिनलही बांधण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे महापालिका मुख्यालयात आज स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी शहरातील बेशिस्त पार्किंग व त्यामुळे होणाऱया वाहतूककोंडीवर चर्चा झाली. शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित करून सर्व सदस्यांचे लक्ष वेधत शहरातील किती गृहसंकुलांमध्ये वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली यासंदर्भात नगरविकास विभागाकडे खुलासा मागितला. तसेच नवीन बांधकाम करताना बिल्डरांना किती क्षेत्रफळ पार्किंगसाठी ठेवण्याची अट आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी होते का, हा प्रश्न केला. यावेळी उपनगर अभियंता रामदास शिंदे यांनी कार्पेट क्षेत्रफळाच्या आधारे पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याची जबाबदारी ही विकासकाची असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या उत्तरावर संताप व्यक्त करत भाईर यांनी घोडबंदर रोड परिसरात पार्किंग प्लाझा उभारण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी केवळ घोडबंदर परिसरातच नव्हे तर बाळकूम, वागळे इस्टेट अशी तीन पार्किंग प्लाझा उभारण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच ट्रकसाठी स्वतंत्र वाहनतळ उभारण्यास सांगितले. त्यासाठी वागळे इस्टेट एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार करून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यास सांगितले.
ठाण्यात सध्या ज्युपिटर हॉस्पिटलजवळ बहुमजली तर गावदेवी मैदानात भूमिगत पार्किंग प्लाझा उभारण्याचे काम सुरू आहे.नौपाडा येथील शाहू महाराज मार्केटच्या जागेवरही पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.मात्र हे तिन्ही पार्किंग प्लाझा व्यतिरिक्त घोडबंदर आणि वागळे परिसरातही वाहनतळांची आवश्यकता असल्याचे स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी सांगितले.





























































