श्री गजानन महाराजांचा 148 वा प्रगटदिन उत्सव भक्तीभावात संपन्न; 2.34 लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने आयोजित श्रींचा १४८ वा प्रगटदिन उत्सव २ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पारंपरिक धार्मिक प्रथा व परंपरेनुसार अत्यंत भक्तीमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेगावसह संस्थानच्या विविध शाखांमध्ये मिळून तब्बल २ लाख ३४ हजार २४० भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

प्रगटदिन उत्सवानिमित्त सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात दररोज पहाटे ६.०० ते ६.४५ काकडा आरतीने सुरुवात झाली. सकाळी ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४.०० ते ५.०० प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६.०० हरिपाठ तर रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न झाली. या सप्ताहात ह.भ.प. राम बुवा डोंगरे (जाटनांदुर), ह.भ.प. मनोज बुवा कुलकर्णी (पिंप्राळा), ह.भ.प. अनिरुद्ध बुवा क्षीरसागर (सावरगाव मा.), ह.भ.प. बळीराम बुवा दौंड (शिवर), ह.भ.प. संभाजी बुवा मेहुणकर (धाराशिव), ह.भ.प. मयूर बुवा बोडखे (श्री क्षेत्र देहू) आणि ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव (जालना) यांनी आपल्या रसाळ वाणीतून कीर्तन सेवा देत भाविकांना भक्तीरसात चिंब भिजवले.

उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘श्री महारुद्र स्वाहाकार यागा’ला माघ वद्य प्रतिपदेपासून प्रारंभ झाला होता. माघ वद्य सप्तमी, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शास्त्रोक्त विधीने या यागाची पूर्णाहूती करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या प्रगटदिनाचे मुख्य कीर्तन होऊन उत्सवाची सांगता झाली. यावर्षीच्या प्रगटदिन उत्सवात श्रींच्या सेवेत एकूण १०२९ दिंड्यांनी सहभाग नोंदविला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या ८८ नव्या दिंड्यांना संस्थानच्या वतीने १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत तसेच श्री माऊली पताका असे संत वाङ्मय व भजन साहित्य वितरित करण्यात आले. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीसाठी सानुग्रह अंशदान व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

उत्सव काळात आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकर्‍यांसाठी ‘विसावा संकुल’ येथे भोजन प्रसादाची तसेच २४ तास प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था संस्थानतर्फे करण्यात आली होती. केवळ शेगावच नव्हे तर श्री संस्थानच्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर व गिरडा या सर्व शाखांमध्येही श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शाखांमधील भाविकांना मिळून एकूण २,३४,२४० जणांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. श्रींच्या कृपेने आणि संस्थानच्या सुयोग्य नियोजनामुळे हा संपूर्ण उत्सव शांततेत, भक्तीभावात आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या वतीने देण्यात आली.