पेनकिलर निमेसुलाइडवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने १०० मिलीग्रामपेक्षा जास्त डोसमध्ये निमेसुलाइडवर बंदी घातली आहे. वेदना आणि ताप कमी करणारे हे औषध रुग्णांसाठी संभाव्य सुरक्षितता धोका आहे. अधिक प्रमाणात घेण्यात येणाऱ्या डोसमुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होऊ शकते. आयसीएमआर आणि सीडीएससीओच्या तज्ञ समितीच्या शिफारशीवर आधारित, आरोग्य मंत्रालयाने २९ डिसेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली. समितीने इशारा दिला की, अधिक प्रमाणात घेतलेल्या डोसमुळे यकृताच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तसेच कधीकधी हे जीवावरही बेतते.

या वर्षी जानेवारीमध्ये, सरकारने प्राण्यांमध्ये वापरण्यासाठी सर्व न्यूमोसाइड औषधांवर आधीच बंदी घातली होती. याचे कारण पर्यावरणीय चिंता होती. गायींवर या औषधाचा वापर केल्यामुळे, गिधाडांसाठी धोका निर्माण होतो. अभ्यासात असे आढळून आले की, औषध घेतल्यानंतर २४ तासांच्या आत गिधाडे मृत्युमुखी पडतात. निमेसुलाइड १९८५ मध्ये इटलीमध्ये सादर करण्यात आले आणि ते NSAID (नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग) श्रेणीशी संबंधित आहे. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह जगभरातील अनेक देशांमध्ये ते मंजूर नाही. दीर्घकाळ वापरल्याने यकृत विषारीपणा, रक्तस्त्राव, मूत्रपिंडाचे नुकसान आणि त्वचेवर पुरळ येऊ शकते.

हिंदुस्थानने २०११ मध्ये मुलांमध्ये निमेसुलाइडच्या वापरावर बंदी घातली होती. परंतु वृद्ध रुग्णांमध्ये त्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती. मार्च २०२३ मध्ये, भारतीय फार्माकोपिया आयोगाने चेतावणी दिली की, या औषधामुळे फिक्स्ड ड्रग इरॅपिश (त्याच भागात वारंवार पुरळ येणे) देखील होऊ शकते.