
सामना ऑनलाईन । मुंबई
वाद सुरू असताना अचानक चेहऱ्या वर पाणी फेकून मारल्यामुळे संतापलेल्या मोठय़ा भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना वरळीत घडली. मोठी झारी मानेवर मारल्याने दिनेश गुप्ता (४१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वरळी पोलिसांनी राजेश गुप्ता (४८) याला अटक केली आहे.
वरळीच्या मद्रासवाडीत ही हत्येची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. राजेश आणि दिनेश एकाच घरात राहत होते, पण काही दिवसांपासून दिनेश काही अंतरावर राहण्यास गेला होता. त्याचा दुधाचा धंदा आहे. त्यामुळे नागरिकांची घरी ये-जा असायची. ही बाब राजेशला खटकायची. यावरून दोघांमध्ये बराच वेळा वाददेखील झाला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी दिनेशने राजेशच्या तोंडावर पाणी फेकून मारले. यामुळे चिडलेल्या राजेशने मोठी झारी घेऊन दिनेशच्या मानेवर मारली. त्यातच दिनेशचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेशला पकडले.

























































