
हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात व्यायामासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार मंगळवारी सायंकाळी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात चालायला गेले होते. दमल्यानंतर ते एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी मोबाइलवर बोलताना तेथे आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले. या प्रकरणाबाबत पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.
पेटीएम खाते अद्यावयात करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून 22 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर फोन करून पेटीएम खाते अद्यायावत न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

























































