गुलमोहोर रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सावेडी उपनगर परिसरातील गुलमोहर रोडवर वादग्रस्त असलेल्या जागेत बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड टाकून उभारण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या 26 दुकाने व हॉटेल्सवर महापालिकेने कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.7) दुपारी ही कारवाई केली.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर मोकळी जागा असून या जागेचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या शेतजमिनीवर बारस्कर कुटुंब कूळ असल्याचे सांगितले जाते. बारस्कर कुटुंबाने या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून गाळे काढले होते व ते दुकानासाठी भाड्याने दिले होते. सदरचे बांधकाम अनधिकृत असल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. सदर बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. तरीही कारवाई करण्यास विलंब केला जात असल्याने अवमान याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी कारवाई करत 16 मोठी दुकाने व हॉटेल्स, तसेच 10 छोटी दुकाने-टप्या हटविल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

दरम्यान, कारवाईची माहिती मिळताच नागरिकांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेवून कारवाईची माहिती घेतली. परिसरातील नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.