Cash For Query : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा

तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रॅण्ड नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महुआ मोईत्रा यांना आता पर्यंत ईडीकडून चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र एकदाही महुआ मोईत्रा चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत.

संसदेत टोकदार प्रश्नाने मोदी सरकारला घाम फोडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा पैसे घेतात असा आरोप केला होता. महुआ मोईत्रा यांनी संसदेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समुहासंदर्भातील होते. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात दुसऱ्या व्यावसायिकाकडून त्यांना भेटवस्तू आणि रोख रक्कम देण्यात आली, असा आरोप दुबे लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात केला.