अकरावी प्रवेशअर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. शुक्रवारी पहिल्याच दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातून 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशनोंदणी पूर्ण केली आहे. तर सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज लॉक केले असून तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.  दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग-2 मध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरता येणार आहे. विद्यार्थी एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन दिवसापर्यंत प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग-1 भरू शकतात. तसेच अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील पाच दिवस विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम (अर्ज भाग- 2) नोंदविता येतील. यादरम्यान कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रियाही सुरू राहणार आहे.