
सुगंधी तांदळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेमोहोर तांदळाने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच भाव खाल्ले आहेत. नव्या हंगामात आंबेमोहोरच्या दरात तब्बल 25 ते 30 टक्क्यांची उसळी घेतली असून, घाऊक बाजारात प्रतिक्विंटल दर 12 ते 14 हजार रुपयांकर पोहोचले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात दरवाढीचा धक्का बसला आहे. सध्या किरकोळ बाजारात एक किलो आंबेमोहोर तांदळाची विक्री सुमारे 140 ते 150 रुपयांपर्यंत केली जात आहे.
मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांत मोठय़ा प्रमाणाकर होणारी आंबेमोहोरची लागवड यंदा घटली आहे. त्यातच निर्यातदार व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केल्याने दरांनी वेग घेतला, अशी माहिती जयराज ऍण्ड कंपनीचे संचालक तांदूळ निर्यातदार धवल शाह यांनी दिली.

























































