हिंदुस्थानने जावयाचं मानपान केलं नाही! ब्रिटीश माध्यमांचा दावा

रविवारी नवी दिल्लीत संपन्न झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेकांनी या परिषदेला हजेरी लावली. या संमेलनादरम्यान ऋषी सुनक यांनी त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतलं. मात्र, सुनक यांना या दौऱ्यात योग्य वागणूक न मिळाल्याचा दावा द गार्डियन या ब्रिटीश वृत्तपत्राने केला आहे.

ऋषी सुनक हे 8 सप्टेंबर रोजी हिंदुस्थानात आले होते. त्यांनी जी-20 परिषदेत हजेरी लावली आणि 10 सप्टेंबर रोजी परत निघून गेले. या दौऱ्याविषयी वार्तांकन करताना गार्डियनने जी-20साठी हिंदुस्थानात हजेरी लावण्याच्या स्पर्धेत त्यांनी स्वतःचा मान गमावला. एक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान मोदी त्यांना भेटले. शनिवारी झालेली ही भेट तशी नव्हती, जशी एका ब्रिटीश पंतप्रधानासोबत होणं अपेक्षित होतं. वास्तविक ही भेट एक दिवस आधीच होणार होती. पण राजकारणामुळे सुनक यांची उपेक्षा केली गेली आणि तो मानसन्मानही दिला गेला नाही, ज्याची अपेक्षा केली होती, असा दावा गार्डियनने केला आहे.

वास्तविक ही भेट पंतप्रधान निवासात होणं गरजेचं होतं, त्याचं छानसं फोटोसेशनही व्हायला हवं होतं. पण, तसं झालं नाही. कारण, मोदींचं निवासस्थान हे जो बायडन यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं, अशी टीका द गार्डियनने केली आहे.